नशिराबादमध्ये वन्यप्राण्याचा धुमाकूळ; लांडग्याच्या हल्ल्यात चार जनावरे ठार
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वन विभागाकडून तातडीने पंचनामा; जनावरे सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
नशिराबाद । धीरज सैतवाल । (प्रतिनिधी) :
नशिराबाद शहरातील हेडकर मोहल्ला परिसरात वन्यप्राण्याने (लांडग्याने) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील गजबजलेल्या सिव्हिल हॉस्पिटलजवळील भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये शिरून लांडग्याने केलेल्या भीषण हल्ल्यात तीन बकऱ्या आणि एक बोकड जागीच ठार झाले आहेत. या घटनेने स्थानिक पशुपालकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
अशी घडली घटना
हेडकर मोहल्ला येथील रहिवासी शेख इरफान शेख नूर यांच्या मालकीच्या शेडमध्ये ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने शेडच्या पत्र्याचे नुकसान करून आत प्रवेश केला आणि जनावरांवर हल्ला केला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
*वन विभागाची तत्काळ पावले*
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक हरीश थोरात (उमाळा) आणि स्वप्निल गोसावी (मेहरुण) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने पंचनामा पूर्ण केला असून, मृतांचा आकडा पाहता संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
*नेत्यांकडून पाहणी व मदतीचे आश्वासन*
घटनेचे गांभीर्य ओळखून नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त शेख इरफान यांचे सांत्वन केले आणि त्यांना सरकारी स्तरावरून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वन विभागाने नशिराबादच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी जनावरे मोकळी न ठेवता सुरक्षित ठिकाणी बांधावीत, परिसराभोवती प्रकाश व्यवस्था ठेवावी आणि संशयास्पद वन्य हालचाली दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
