पाच वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी • मोहाडी पोलिसांकडून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल
हॉटेल आदर्शसमोर भीषण अपघात • मालेगावहून धुळ्याकडे येताना दुर्घटना • भरधाव वाहनांवर नियंत्रणाची नागरिकांची मागणी
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरालगतच्या सुरत बायपास रिंगरोडवर झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सुरत बायपास रिंगरोडवरील हॉटेल आदर्शसमोर हा अपघात झाला. पुरमेपाडा येथील रहिवासी जितेश ऊर्फ मयुर नंदलाल कुलकर्णी (वय ३६) हे पत्नी मोनाली मयुर कुलकर्णी (वय ३०) आणि पाच वर्षीय मुलगा खुशाल मयुर कुलकर्णी यांच्यासह दुचाकीवरून मालेगावहून धुळ्याकडे येत होते.
यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अनियंत्रित कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जितेश कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा खुशाल यांना डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मोनाली कुलकर्णी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण तसेच चालकाच्या निष्काळजीपणाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सुरत बायपास रिंगरोडवर भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या मार्गावर वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
