कारवाई न झाल्यास जिल्हाभर ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा • तरुणाई, शेतकरी आणि कुटुंबांचे होत असल्याचा गंभीर आरोप
अवैध दारूविक्रीविरोधात राष्ट्रीय भीमसेनेचे निवेदन • छापेमारी करून कठोर कारवाईची मागणी • प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील हडसन, पहान आणि नांद्रा परिसरात सुरू असलेली अवैध गावठी दारूची विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भीमसेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष वाल्मीक लालचंद जाधव यांनी पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच, तातडीने कारवाई न झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हडसन, पहान आणि नांद्रा या गावांमध्ये अवैध गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू असून त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहेत. व्यसनाधीनतेमुळे अनेक कष्टकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत असून ग्रामीण भागातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रीय भीमसेनेने विशेषतः तरुण पिढीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गावांतील अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून काही शालेय विद्यार्थीही या विळख्यात अडकत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य धोक्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, व्यसनाधीनतेमुळे शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष करत असून त्याचा परिणाम शेती उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीचा प्रश्न हा केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून सामाजिक आरोग्याशी निगडित असल्याचे राष्ट्रीय भीमसेनेने स्पष्ट केले आहे.
निवेदनानुसार, पहान गावात गेल्या सुमारे २० वर्षांपासून दारूबंदी लागू असतानाही नांद्रा–पहान मार्गावर तसेच पहान शिवारात खुलेआम गावठी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्यांना अनेकदा समज दिल्यानंतरही काही काळ विक्री बंद करून पुन्हा पूर्ववत व्यवसाय सुरू केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तातडीने छापेमारी करून अवैध दारूविक्री बंद करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घेतली नाही तर राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाल्मीक लालचंद जाधव यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीमुळे पाचोरा तालुक्यातील अवैध गावठी दारूविक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, याप्रकरणी पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
