समाजजागृती व महिला सक्षमीकरणातील योगदानाची दखल; राष्ट्रीय राजपूत करणी सेनेकडून सन्मान
भुसावळ | प्रतिनिधी
महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा जयश्री पाटील आणि प्रतीक्षा पाटील यांना समाजजागृती व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राजपूत महिला समाज रत्न (समाज भूषण) पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कट्यार यांच्या हस्ते तसेच परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा सन्मान करण्यात आला.
राजपूत समाजातील महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी आनंदसिंह ठोके, विलासदादा पाटील, दामोदर राजपूत, संदीप राणा, डॉ. विश्वजित सिसोदिया, विठ्ठलसिंह मोरे यांच्यासह राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना जयश्री पाटील आणि प्रतीक्षा पाटील यांनी सांगितले की, “हा सन्मान समाजाप्रती केलेल्या कार्याची पावती असून, सारिका ताई पाटील यांच्या प्रेरणेने समाजसेवा अधिक जोमाने करण्याची ऊर्जा या पुरस्कारातून मिळाली आहे.”
या उल्लेखनीय यशाबद्दल समाजबांधवांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
