निकृष्ट आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा आरोप; वसतिगृहाच्या दुरवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
संजय मोहिते शहादा (नंदुरबार) | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालक आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहात पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याने विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) झाल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांच्या तोंडाला फेस आल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच वसतिगृहाची पाहणी करून तेथील सुविधांबाबत गंभीर आक्षेप नोंदविले.
पँथर सेनेने आरोप केला की, वसतिगृहातील खोल्या अस्वच्छ असून गाद्या व बेड जीर्ण अवस्थेत आहेत. शौचालये व स्नानगृहांची स्थिती अत्यंत खराब असून काही ठिकाणी दरवाजे नसल्याचे निदर्शनास आले. पाणीपुरवठ्याची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना वरच्या मजल्यावर पाणी नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच वर्षभरापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वॉशिंग मशीन वापरात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पँथर सेनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे समजते. या घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत अहवाल व तपासाची प्रतीक्षा असून, विषबाधेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
