आषाढी एकादशी व वारीच्या पार्श्वभूमीवर कालावधीत वाढ; प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५ हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी माहिती दिली.
महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार या अभियानाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हे शिबीर २२, २५ आणि २६ जुलै २०२६ या तीन दिवसांपैकी एका दिवशी आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने पंढरपूर वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका दिवशी शिबिराचे आयोजन करता येणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिबिरासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान ५ हजार कुटुंबांना, तर राज्यभरात १० लाख कुटुंबांना विविध योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ
समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाण जागेचे वाटप, नागरिकांना स्वामित्व सनद देणे, ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच महसूल विभागाची ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
याशिवाय निवासी व व्यावसायिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी ‘विशेष अभय योजना-२०२५’ ला मुदतवाढ, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटपपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करणे, कुंभार समाजातील नागरिकांना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती, ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ तसेच वंचित व अनाथ घटकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जिल्हा परिषद आणि लीड बँकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली आहे. संबंधित विभागांना पात्र लाभार्थ्यांची तालुकानिहाय व योजनानिहाय माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी स्वतः या शिबिरांना उपस्थित राहून अभियानाचे नियंत्रण करणार आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, कलाकार, साहित्यिक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पात्र लाभार्थ्यांनी २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा’ मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
