एणगाव येथील घटना; पती व सासूलाही मारहाण केल्याची तक्रार
बोदवड | प्रतिनिधी
बोदवड तालुक्यातील एणगाव येथे जुन्या वादातून एका महिलेच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी महिलेबरोबर गैरवर्तन तसेच तिच्या पती व सासूला मारहाण करून दुखापत केल्याच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, संशयित सहा जणांनी जुन्या वादाच्या कारणावरून तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत वाद घातला.
त्यानंतर एका संशयिताने महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच महिलेच्या पतीला मारहाण करून दुखापत करण्यात आली असून, तिच्या सासूलाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
