कारंजा मोहिमेदरम्यान जखमी घोड्यावर वैद्य दामाजी पाटील येवले यांनी केले उपचार; अजिंठा डोंगररांगांतील ऐतिहासिक ठेवा आजही जतनाची वाट पाहतो
भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे)
अजिंठा डोंगररांगांच्या कुशीत आणि काटेपूर्णा नदीच्या तीरावर वसलेले धानोरा हे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील ऐतिहासिक गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे विशेष ओळखले जाते. अकोल्यापासून सुमारे ३८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावातील ‘येवलेंची गढी’ इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
इतिहासातील उल्लेखानुसार, सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कारंजा (लाड) येथील मोहिम यशस्वी करून परतत असताना शत्रूला चकवा देण्यासाठी दुर्गम मार्गाने प्रवास करत होते. यावेळी सैन्यातील एक महत्त्वाचा घोडा जखमी झाला. हा घोडा अत्यंत विश्वासू असल्याने त्याच्या उपचारासाठी महाराजांनी धानोरा गावातील प्रसिद्ध वैद्य दामाजी पाटील येवले यांची मदत घेतली.
दामाजी पाटील हे केवळ माणसांवरच नव्हे तर पशू-पक्ष्यांवरही उपचार करणारे नामवंत वैद्य होते. शिवरायांच्या गुप्तहेर यंत्रणेला त्यांच्या कौशल्याची माहिती असल्याने महाराजांनी आपला मार्ग बदलून येवलेंच्या गढीवर भेट दिली. येथे जखमी घोड्यावर उपचार झाल्यानंतर महाराज पुढील मोहिमेसाठी रवाना झाल्याची ऐतिहासिक परंपरा सांगितली जाते.
या परिसराला ऐतिहासिक आणि पौराणिक वारशाची जोड लाभली आहे. गढीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडव लेणी या महाभारतकालीन स्थळाशी संबंधित असल्याची स्थानिक परंपरा आहे. वनवासाच्या काळात पांडव येथे काही काळ वास्तव्यास होते, असा उल्लेख काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये आढळतो. आज ‘येवलेंची गढी’ भग्नावस्थेत असली तरी तिचे उरलेले अवशेष तत्कालीन वैभवाची साक्ष देतात. भव्य बांधकामशैली, ऐतिहासिक महत्त्व आणि शिवकालीन स्मृती जपणारी ही गढी संवर्धनाच्या प्रतीक्षेत असून इतिहासप्रेमींसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरू शकते.
