‘घर पर चाय-नाश्ता करने १० लोगों को भेजता हूँ’ असा धमकीचा संदेश; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांना पत्र पाठवून कारवाईची मागणी
राजू झनके मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्त्या उषाताई चौधरी यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची गंभीर धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुती आणि विशेषतः भाजपविरोधात लोकशाही मार्गाने भूमिका मांडणाऱ्या उषाताई चौधरी यांना फेसबुकवरून “घर पर चाय-नाश्ता करने १० लोगों को भेजता हूँ” असा धमकीचा संदेश पाठविण्यात आला. या संदेशानंतर त्यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नागपूर पोलिसांकडे पत्र पाठवून तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली आहे.
धमकीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून, लोकशाही मार्गाने मत व्यक्त करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
