विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व संस्कारक्षम उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पाळधी | प्रतिनिधी
पाळधी येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी VES DMIT अंतर्गत ‘ब्रेनमॅपिंग’ सेशन तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘यशोदा स्पर्श – कान्हाचे संस्कार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन्ही उपक्रमांना विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ब्रेनमॅपिंग सेशनमध्ये VES DMITचे संस्थापक डॉ. अजय दरेकर (मुंबई) यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, शिकण्याची पद्धत, एकाग्रता, स्मरणशक्ती, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखून अभ्यासाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी उपयुक्त दिशा मिळाली.
प्राथमिक विभागासाठी आयोजित ‘यशोदा स्पर्श – कान्हाचे संस्कार’ कार्यक्रमात डॉ. अजय दरेकर यांनी ‘पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. भगवान श्रीकृष्ण यांच्या बालचरित्रातून यशोदा मातेने दिलेले प्रेम, सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, मैत्री आणि उत्तम संस्कार यांचे महत्त्व कथा, गीते, संवाद आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून पालकांना समजावून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. याशिवाय उपस्थित माता-पालकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे चेअरमन इंजी. नरेश चौधरी, संचालक जी. डी. पाटील, विमल सोमण, प्राचार्य आर. एल. माळी, शारदा पाटील, भाग्यश्री आळंदे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार आणि जीवनमूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. अशा नाविन्यपूर्ण आणि संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा शाळेचा संकल्प अधिक दृढ होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
