डी-मार्टजवळील विश्वकर्मा भवन परिसरात छापा; ३ लाखांचा गांजा व ५० हजारांची अॅक्टिव्हा जप्त, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी
धुळे शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईला गती देत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सुमारे १२ किलो गांजासह दोन तरुणांना अटक केली. या कारवाईत सुमारे ३ लाख रुपये किमतीचा गांजा तसेच ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे (वारे) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अॅक्टिव्हा (क्रमांक MH-18/BK-0311) वरून दोन तरुण धुळे शहरातील डी-मार्टजवळील विश्वकर्मा भवन परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला.
राजपत्रित अधिकारी, दोन शासकीय पंच, छायाचित्रकार आणि वजनकाटा धारक यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या छाप्यात संशयित अॅक्टिव्हा थांबवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी गोणीत ठेवलेला सुमारे १२ किलो गांजा आढळून आला.
या प्रकरणी निखिल गोकुळ पाटील (वय २५, रा. छोरिया नगर, डी-मार्टजवळ, धुळे) आणि चेतन जीवन पावरा (वय २१, रा. सैनिक कॉलनी, नगावबारी, धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ३ लाख रुपये किमतीचा गांजा आणि ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क), २०(ब), २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अमली पदार्थांची अवैध तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
