नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांच्या पाठपुराव्याला यश; विठ्ठल मंदिर परिसर झाला प्रकाशमय
विठ्ठल मंदिर परिसर उजळला • बंद हायमास्ट दिवा दुरुस्त • नागरिकांनी व्यक्त केले समाधान • नगरपरिषदेच्या विद्युत विभागाची तत्पर कारवाई
धरणगाव | वाल्मिक पाटील, प्रतिनिधी
धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विठ्ठल मंदिर परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेला हायमास्ट लॅम्प अखेर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
सध्या विठ्ठल मंदिर आणि सभागृहाचे बांधकाम सुरू असल्यामुळे या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत आहे. मात्र, हायमास्ट लॅम्प व स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारमय होत होता. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांनी नगर परिषदेचे विद्युत अभियंता राहुल एस. तळेले यांच्याशी संपर्क साधून हायमास्ट लॅम्प तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली. त्यानुसार अभियंता तळेले यांनी इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी किशोर वाघ, रावसाहेब पाटील आणि संदीप सोनवणे यांना घटनास्थळी पाठवून आवश्यक तांत्रिक दुरुस्ती करून घेतली.
युद्धपातळीवर काम पूर्ण करत कर्मचाऱ्यांनी बंद पडलेला हायमास्ट लॅम्प आणि स्ट्रीट लाईट पुन्हा कार्यान्वित केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारात असलेला विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय झाला असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
यावेळी सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष उदय सोळंके, सदस्य पुरुषोत्तम सुतारे, विलास बिचवे, गोलू चौधरी, प्रेम ठाकरे, शोएब रजा यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नगरसेवक हाजी इब्राहिम शेख, विद्युत अभियंता राहुल एस. तळेले आणि इलेक्ट्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अशीच तत्परता कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
