शासकीय जमिनी हस्तांतरण, आरटीओ कार्यालय, स्मारके आणि सुकी नदी परिसराच्या विकासाला गती देण्याबाबत प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
भडगाव | प्रतिनिधी
भडगाव शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाच्या विषयांवर जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. शहरातील वडधे, कराब, पेठ आणि यशवंतनगर परिसरातील शासकीय जमिनींसह अनेक प्रलंबित विकास प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विकासकामांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
बैठकीत जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील काही जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भगोटाधारक ग्रामस्थांच्या जागांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय झाला.
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्यासाठी योग्य जागा निश्चित करणे तसेच थोर राष्ट्रपुरुष आणि महान विभूतींच्या स्मारकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
याशिवाय शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या सुकी नदीच्या पात्रातील जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळवून त्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्र, मनोरंजन केंद्र आणि नागरिकांसाठी आवश्यक विकासकामे उभारण्याच्या प्रस्तावावरही सविस्तर चर्चा झाली.
भडगाव शहराचा दीर्घकालीन आणि नियोजनबद्ध विकास, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच भविष्यातील विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीत चर्चिलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी झाल्यास भडगाव शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
