श्री मंगळग्रह मंदिरात आयसीडीएसअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा; तणाव व्यवस्थापन व मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन
अमळनेर | प्रतिनिधी
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण तणावग्रस्त होत असून, बदलत्या आहारपद्धतीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी सकारात्मक विचार, सात्त्विक आहार आणि संतुलित जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी केले.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार (दि. १८ जुलै) रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत श्री. भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत मंदिरामार्फत राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच मंदिरातील धार्मिक परंपरा व पूजाविधींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलता पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाता चौधरी, सौ. भाग्यश्री पाटील, श्रीमती प्रीती देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री. भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सौ. वर्षा भदाणे, पाचोऱ्याच्या सीडीपीओ संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती प्रीती देवरे यांनी आभार मानले.
