एसआरपीएफमध्ये निवड झालेल्या माजी विद्यार्थ्याचा सत्कार; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
भवरखेडे | प्रतिनिधी
भवरखेडे येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शांताराम दाजीबा पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सोनल पाटील तसेच गावातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल रमेश पाटील याची एसआरपीएफ (SRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापिका सोनल पाटील यांनी प्रास्ताविकातून शिक्षक-पालक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शांताराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटील व सुनीता लोहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस. एस. पाटील, स्वप्निल पवार, आर. बी. ठाकरे, पंकज ठाकरे, अनिता पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी गणेश पाटील व अजय बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.
