शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम; कु. लक्षिता पाटीलचा वाढदिवस समाजसेवेत साजरा
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ)
आजच्या काळात वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे करण्याची स्पर्धा सुरू असताना, समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाढदिवस साजरा करण्याचा प्रेरणादायी आदर्श शिवसेना-युवासेना आणि स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांनी घालून दिला. कु. लक्षिता लखीचंद पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कोणत्याही ऋतूची पर्वा न करता कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे, वाढदिवसाचा केक सफाई कर्मचाऱ्यांच्या शुभहस्ते कापण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट देत त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संदेशही देण्यात आला. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांचा सन्मान हीच खरी समाजसेवा असून, “स्वतःचा आनंद समाजाच्या सेवेत वाटला, तरच वाढदिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरतो,” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक संतोष महाजन, जग्गू भोई, अतुल पाटील, जहांगीर मालचे, देवाजी आहिरे, विजयकुमार भोसले, राहुल ठाकरे, महेंद्र ततार, वाल्मिक पवार, पिंटू मराठे, भोला पाटील तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी, संचालक, सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता या तिन्ही मूल्यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. त्यामुळे हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीचा उत्सव न ठरता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. या अभिनव उपक्रमाचे नागरिकांसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
