स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच आरोपी अटकेत, दोन फरार
भडगाव | प्रतिनिधी गणेश रावळ
भडगाव येथील भारत फायनान्स कंपनीची जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात फायनान्स कंपनीत पूर्वी काम केलेल्या एका माजी कर्मचाऱ्यानेच साथीदारांच्या मदतीने लुटीचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.
याप्रकरणी यश हिरामण हटकर (रा. शिवनेरी गेट, भडगाव) यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकाळ करीत होत्या.
माजी कर्मचाऱ्याने दिली आतील माहिती
१० जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान उदय छोटू गायकवाड (२२, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले.
उदय हा यापूर्वी भडगाव येथील भारत फायनान्स कंपनीत कार्यरत असल्याने, कंपनीतील रोकड कोण, किती वाजता आणि कोणत्या मार्गाने घेऊन जातो, याची त्याला संपूर्ण माहिती होती. पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पाच आरोपी अटकेत, दोन फरार
पोलिसांनी अनिल दिलीप पाटील (३१, रा. पळासखेडा), विशाल मधुकर गांगुर्डे (२६, रा. पूर्वीपाडा, धुळे), निलेश अण्णा पवार (२०, रा. अनकवाडी) आणि योगेश प्रकाश पवार (२२, रा. अनकवाडी) यांना अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी आरोपी वेगवेगळ्या मोटारसायकलींवरून भडगाव येथे आले होते. पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून त्याची बॅग हिसकावण्याचा कट त्यांनी रचला. काही आरोपी एका मोटारसायकलवरून, तर इतर आरोपी दुसऱ्या मोटारसायकलवरून पुढे-मागे राहून हालचालींवर लक्ष ठेवत होते. उदय गायकवाड हा साथीदारांशी सातत्याने संपर्कात होता. गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी आपापल्या घरी परतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील सागर हिम्मत पाटील (रा. पळासखेडा) आणि हर्षल चांगदेव अहिरे (रा. येवला) हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
