जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांचे आंदोलन; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था-संघटनांच्या वतीने सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करण्यात येणार आहे.
आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमितता, त्यासंदर्भातील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान सन्मान संमेलनाचे आयोजक मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केले आहे.
