स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकार थांबविण्याची मागणी; आंदोलनाच्या अधिकाराचे संरक्षण आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणविषयक प्रश्नांवर आंदोलन करणारे कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या मागण्यांचा संविधानिक दृष्टिकोनातून विचार करून त्या मान्य कराव्यात तसेच देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जळगाव जिल्हा संविधान प्रेमी नागरिक मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदनात देशातील स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थी अनेक महिने अथक परिश्रम करून परीक्षेची तयारी करतात. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द अथवा पुढे ढकलल्या जातात. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या भविष्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालावा आणि या परिस्थितीची जबाबदारी निश्चित व्हावी, या मागण्यांसाठी सोनम वांगचूक यांनी २८ जून २०२६ पासून नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच, आंदोलनादरम्यान सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आल्याच्या घटनेचाही निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा आणि न्यायाची मागणी करण्याचा अधिकार देत असल्याचे नमूद करत, या अधिकारांचे संरक्षण करणे ही लोकशाही व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले.
देशातील युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करून स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही संविधान प्रेमी नागरिक मंचाने केली आहे.
हे निवेदन मुकुंदभाऊ सपकाळे, जयसिंग वाघ, प्रा. प्रितीलाल पवार, प्रा. किसन हिरोळे, चंद्रगुप्त सुरवाडे, दिलीप सपकाळे, जगदीश सपकाळे, श्रीकांत बावीस्कर, गोपाल भालेराव, सोमा भालेराव, महेंद्र केदार, वाल्मीक जाधव, सुभाष साळुंखे, संध्या तायडे, काजल वाघ, निलुताई इंगळे, प्रतिभा घोडेश्वर, मुकुंद नन्नवरे, वैशाली झालटे, डॉ. प्रकाश वानखेडे यांच्यासह अनेक संविधान प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले.
