मागील भिंत फोडून बँकेत प्रवेश; तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला, CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास
नाशिराबाद | प्रतिनिधी
नाशिराबाद शहरातील तरसोद फाट्याजवळ असलेल्या HDFC बँकेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि तिजोरी फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा हा डाव फसला असून त्यांच्या हाती कोणतीही रक्कम लागली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी HDFC बँकेचे व्यवस्थापक वसीद अली सय्यद (वय ४५) यांनी नाशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री बँकेचे नियमित कामकाज आटोपल्यानंतर सर्व कर्मचारी बँक बंद करून घरी गेले होते. त्यानंतर २१ जुलै रोजी मध्यरात्री सुमारे १२.५९ वाजता दिल्ली येथील बँकेच्या कमांड सेंटरकडून बँकेच्या CCTV प्रणालीवर संशयास्पद हालचालींचा अलर्ट प्राप्त झाला.
बँकेत दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केल्याची माहिती मिळताच बँक व्यवस्थापनाने तातडीने नाशिराबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बँकेचे व्यवस्थापक, विभाग प्रमुख तसेच नाशिराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बँकेची पाहणी केली असता, चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केल्याचे आढळून आले.
यानंतर चोरट्यांनी बँकेची तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरीतील कोणतीही रक्कम चोरट्यांना लंपास करता आली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध नाशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून बँकेतील तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात येत असून, चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत.
