भर पावसातही अनुयायांचा उत्साह कायम; लांडोर बंगला धुळे येथे ३१ जुलैला हजारो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीचे आवाहन
पाळधी, ता. धरणगाव | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या १०० किलोमीटर भीमस्मृती धम्म पदयात्रेचे पाळधी (ता. धरणगाव) येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भंते नागसेन सातपुडा पर्वत यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली आहे.
ही धम्म पदयात्रा २१ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रेल्वे स्टेशन जळगाव ते लांडोर बंगला, धुळे या ऐतिहासिक मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला प्रारंभ झाला.
पदयात्रेला ज्ञानज्योती मातेरो ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर यांचे मार्गदर्शन लाभत असून देशभरातील अनेक मान्यवर भिक्खू संघ व धम्म अनुयायी सहभागी झाले आहेत. भंते प्रिय बोधी, भंते चार धम्मो, भंते सुगत बुद्धी, भंते सागर, भंते धम्मज्योती, भंते आनंद, भंते धम्मरत्न, भंते संघरक्षित, भंते आर्यनाग आणि भंते सुमित मोदी यांच्यासह अनेक धम्म प्रचारकांचा सहभाग आहे.
पाळधीत अनुयायांनी केले उत्स्फूर्त स्वागत
२१ जुलै रोजी सायंकाळी भीमस्मृती धम्म पदयात्रा पाळधी येथे दाखल झाली. यावेळी बौद्ध उपासक-उपासिकांनी पुष्पवृष्टी, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यात्रेचे स्वागत केले. रात्री पाळधी येथे पदयात्रेचा मुक्काम झाला.
२२ जुलै रोजी सकाळी त्रिसरण व पंचशील ग्रहण करून पदयात्रा पुढील प्रवासासाठी एरंडोलच्या दिशेने रवाना झाली. सकाळी १० वाजता निघालेली यात्रा दुपारी १ वाजता वराड (ता. धरणगाव) येथे पोहोचली. भर पावसातही अनुयायांचा उत्साह कायम होता. त्यानंतर ही यात्रा सायंकाळी माळपिंप्री (ता. एरंडोल) येथे पोहोचली असून येथे मुक्काम करण्यात आला.
३१ जुलैला लांडोर बंगला येथे हजारोंच्या उपस्थितीचे आवाहन
पाळधी येथे धम्म पदयात्रेच्या स्वागतावेळी आंबेडकरी समाजाचे नेते तथा धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी ३१ जुलै रोजी धुळे येथील लांडोर बंगला येथे हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिकांनी उपस्थित राहून अभिवादन करावे, असे आवाहन केले.
स्वागतासाठी मान्यवरांची उपस्थिती
धम्म पदयात्रेच्या स्वागत कार्यक्रमास शिवसेना मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, माजी सरपंच चंद्रवणी नन्नवरे, चैतन्य नन्नवरे, विजय सपकाळे, विजय वाघ, किरण नन्नवरे, रतन अडकमोल, प्रणय नन्नवरे, गोकुळ केदार, बाळा नन्नवरे, अशोक नन्नवरे, सुभाष नन्नवरे, संजय जाधव, बेबा ताई नन्नवरे, शारदा सोनवणे, संगीता साळुंखे, भारती नन्नवरे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
लांडोर बंगला बाबासाहेबांच्या ऐतिहासिक स्मृतींचे स्थळ
३१ जुलै १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन प्रकरणाच्या संदर्भात वाघाडी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धुळे येथील लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी भीमस्मृती धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
