जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई! जळगावातील ३२५ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे कायमस्वरूपी बंद
कामकाजातील अनियमिततेवर प्रशासनाचा कडक बडगा; नागरिकांच्या तक्रारीनंतर ब्लॅकलिस्टची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजातील गंभीर अनियमितता आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मोठी कारवाई करत तब्बल ३२५ सेवा केंद्रे कायमस्वरूपी बंद (ब्लॅकलिस्ट) करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे निष्काळजी सेवा केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या तपासणीत संबंधित सेवा केंद्रे गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून बंद असल्याचे आढळून आले. या केंद्रांद्वारे नागरिकांना विविध शासकीय दाखले व ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना केंद्रे बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर संबंधित केंद्र चालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला.
प्रशासनाने स्पष्ट केले की, शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पारदर्शक, जलद आणि कार्यक्षमतेने पोहोचणे आवश्यक असून कामकाजातील निष्काळजीपणा किंवा अनियमितता कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.
या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर सेवा केंद्र चालकांनीही कामकाजात शिस्त व पारदर्शकता राखावी, असा संदेश प्रशासनाने दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, यामुळे शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
