दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ धुळ्यात आझाद समाज पार्टीचे धरणे आंदोलन
NEET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; २५ जुलैला आंदोलनाची घोषणा
धुळे | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आझाद समाज पार्टी (काशीराम) आणि भीम आर्मी, धुळे जिल्ह्याच्या वतीने २५ जुलै रोजी धुळ्यात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा तसेच काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचा दावा करण्यात आला.
यावेळी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रदेश महासचिव दिलीप मोहिते यांनी २५ जुलै रोजी धुळ्यात व्यापक जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देत, संविधानवादी नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी दिलीप मोहिते, जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण (रावण), भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ, जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष दादाबाबा सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राम सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
