सत्यशोधक महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
नगरसेवक अनिल महाजन यांचा समाजोपयोगी उपक्रम; ‘महात्मा फुले यांनी भारतीयांना गुलामगिरीतून मुक्त केले’ – पी. डी. पाटील
वाल्मिक पाटील एरंडोल | वाल्मिक पाटील
सत्यशोधक समाजाचे संस्थापक, शिक्षणक्रांतीचे प्रणेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सत्यशोधक समाज संघ, एरंडोल आणि नगरसेवक अनिल महाजन यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त तहसीलदार अरुण माळी, नगरसेवक अनिल महाजन, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन, रुपेश महाजन, नगरसेविका सुनीता माळी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, आनंद दाभाडे, नगरसेवक रवींद्र महाजन, मनोज महाजन, तालुकाध्यक्ष हिलाल माळी तसेच अनिल महाजन मित्र परिवार आणि सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या जीवनसंघर्षाची प्रेरणादायी माहिती मांडली. “भारतीयांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे कार्य सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांनी केले,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
शाळेचे संचालक अरुण माळी यांनीही या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अनिल महाजन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या अनिल महाजन यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. “वाढदिवस केवळ उत्सवापुरता न ठेवता गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम ही समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
