आषाढी एकादशीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
शिवडीतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह शैक्षणिक साहित्याचे वितरण
शिवडी, मुंबई (प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका (वॉर्ड क्र. २०२) यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. परिवार साफल्य हाऊसिंग सोसायटीबाहेर, दा. ग. महाजनी पथ, शिवडी येथे आयोजित या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, इरेझर आणि शार्पनरचे वाटप करण्यात आले.
शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महासचिव समीर कांबळे, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाचे आयोजन गुणवंत भालेकर, प्रतीक जाधव, महेश तांबे, संजय भालेराव, सुभाष काळे, प्रदीप गुलाबराव जाधव, सुमेर खरे, ॲड. विकास गांगुर्डे, सतीश गांगुर्डे, वेदांत पागडे, वैशाली विजय भालेराव, महेश्वरी तांबे, श्रद्धा भालचंद्र जाधव, उज्वला काळे आणि वैशाली गुणवंत भालेकर यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
