दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात मुख्यमंत्री जन-आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० रुग्णांनी घेतला लाभ
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, निदान, औषधोपचार व विविध आरोग्य सेवा; गंभीर आजारांवरील उपचारांचीही माहिती
दोंडाईचा | प्रतिनिधी :
दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मुख्यमंत्री जन-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध आजारांची तपासणी, निदान, सल्ला, उपचार आणि औषध वितरणासह अनेक आरोग्य सेवांचा लाभ सुमारे ४०० रुग्णांनी घेतला.
शिबिराचे उद्घाटन धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीजी सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ गिरासे, गटनेते निखिल जाधव, रुग्ण कल्याण समितीचे प्रविण महाजन, जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाजन, ज्येष्ठ नागरिक के. एम. अग्रवाल, रवि अहिरे तसेच पत्रकार रणजित राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिबिराच्या उद्देशाची माहिती दिली. रुग्ण कल्याण समितीचे प्रविण महाजन यांनी एकाच छताखाली विविध आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना योग्य निदान, सल्ला व उपचार मिळत असल्याचे सांगून अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ गिरासे यांनी शासनाचा हा लोकहिताचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत अशा आरोग्य शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे नमूद केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीजी सोनावणे यांनी धुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या अधिपत्याखालील सर्व दहा संस्थांमध्ये जन-आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शिबिरात निदान झालेल्या कर्करोग व हृदयरोगग्रस्त रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारख्या उपचारांची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून नागरिकांनी आपले आरोग्य कार्ड काढून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिरात औषध वाटप, लसीकरण, प्रयोगशाळा तपासणी, क्ष-किरण तपासणी, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी, ईसीजी, असंसर्गजन्य आजारांची नोंदणी व उपचार तसेच शस्त्रक्रियापूर्व तपासणी आदी विविध सेवा देण्यात आल्या.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सलमान कुरेशी, डॉ. अवनी पाटील, डॉ. तेजस जैन, डॉ. दर्शन पाटील, डॉ. मनीषा भावसार, डॉ. रुचिता पाटील, डॉ. युतीका भामरे, डॉ. पंकज राजपूत, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. महाले, डॉ. गणेश खैरनार, डॉ. शुभांगी गजभिये, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. युगंधरा शिसोदे आणि वरुण चौधरी यांच्यासह डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. भविष्यातही विविध प्रसंगी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
