कुंभारीतील कथित आर्थिक गैरव्यवहार व पीएम आवास घरकुल प्रकरणाची S.I.T. चौकशीची मागणी
गोदुताई महिला विडी घरकुल गृहनिर्माण संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी; पीएम आवास योजनेतील १५,०२४ घरकुलांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना स्थगिती देण्याचीही मागणी
कुंभारी | प्रतिनिधी :
कुंभारी परिसरातील गोदुताई महिला विडी घरकुल गृहनिर्माण संस्थेमध्ये कथितरित्या सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार, बेकायदेशीर आर्थिक वसुली, नागरिकांवरील कथित दडपशाही, बनावट लेखापरीक्षण आणि संगनमताने झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय विशेष तपास पथक (S.I.T.) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात या प्रकरणातील दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, तसेच संस्थेचा कारभार पारदर्शकपणे चालावा यासाठी गोदुताई महिला विडी घरकुल गृहनिर्माण संस्थेवर तात्काळ प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रे नगर हौसिंग फेडरेशन येथे उभारण्यात आलेल्या १५,०२४ घरकुलांच्या बांधकामामध्ये कथित गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाचीदेखील S.I.T. मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. तसेच चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित संस्थेचे चेअरमन, सचिव व इतर पदाधिकारी तसेच संबंधित विकासक पंधे कन्स्ट्रक्शन यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. सदर मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी व संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
