अमळनेर पोलिसांची पहाटे धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर जप्त
बोरी नदीपात्रात छापा; सहा चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर पोलिसांनी अवैध गौणखनिज (वाळू) चोरी आणि वाहतुकीविरोधात मंगळवारी पहाटे मोठी कारवाई करत बोरी नदीपात्रातून वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले. या कारवाईत सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित ट्रॅक्टरच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी (दि. २८ जुलै) पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान बोरी नदीपात्रात छापा टाकला.
कारवाईदरम्यान हिंगोणे गावाजवळील नदीपात्रातून पाच विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि MH-19 CJ-0775 क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली अशा एकूण सहा वाहनांमधून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस ठाण्यात जमा केली.
या कारवाईत योगेश नामदेव भोई (रा. रुबजीनगर, अमळनेर), प्रविण सुधाकर सोनवणे (रा. हिंगोणे खुर्द), राहुल छोटू ठाकरे (रा. रुबजीनगर), अर्जुन अशोक मालचे (रा. हिंगोणे खुर्द), सतीश मोहन बावीस्कर (रा. हिंगोणे खुर्द) आणि सोमनाथ मधुकर मोरे (रा. रुबजीनगर) या सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून चालकांविरुद्ध तसेच संबंधित वाहनांबाबत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून ट्रॅक्टरच्या मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई सुरू राहणार असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही.
