पहूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे उद्घाटन; विविध विकासकामांचे भूमिपूजन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन; ऊसतोड कामगारांना कार्ड वितरण व मोफत नोंदणी मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
गणेश रावळ भडगाव तालुका | प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील पहूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनासह श्री संगमेश्वर महादेव मंदिराच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगारांना कार्ड वितरण व मोफत नवीन नोंदणी अभियान अशा विविध उपक्रमांनी सजलेला भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती जामनेरचे सभापती बाबुराव (आण्णा) घोंगडे होते.
यावेळी सेवानिवृत्त उपअभियंता जे. के. चव्हाण, भाजप पूर्व जळगावचे अध्यक्ष चंद्रकांतअण्णा बाविस्कर, नगरसेवक जितुभाऊ पाटील, दीपकभाऊ तायडे, भाजप पूर्व जामनेरचे अध्यक्ष मयूर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमितभाऊ देशमुख, राजधरभाऊ पांढरे, जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीपभाऊ लोढा, विकास सोसायटीचे चेअरमन गोकुळदादा कुमावत, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले आणि नव्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणीही करण्यात आली. या उपक्रमाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा भव्य सोहळा प्रज्ञासूर्य प्रबुद्ध युवा हितकारिणी बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, पहूर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ऊसतोड कामगार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
