अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; ३ ब्रास मुरूमासह डंपर जप्त
भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त कारवाई; चालक ताब्यात, महसूल नियमांनुसार दंडात्मक प्रक्रिया सुरू
संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी :
भुसावळ तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत सुमारे ३ ब्रास अवैध मुरूमासह एक डंपर जप्त केला. तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१९-सीएक्स-६७११ क्रमांकाचा डंपर तळवेल परिसरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाने सापळा रचून संबंधित वाहन अडविले. तपासणीदरम्यान डंपरमध्ये सुमारे ३ ब्रास मुरूमाचा अवैध साठा आढळून आला.
या प्रकरणात चालक सतीश गोपाळ कोळी (रा. ओझरखेडा, ता. भुसावळ) याच्याकडून वाहन ताब्यात घेण्यात आले असून, डंपरचे मालक अनिकेत इंगळे (रा. ओझरखेडा, ता. भुसावळ) असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधितांकडे गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याने वाहन जप्त करण्यात आले असून महसूल नियमांनुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे, पोलीस उपनिरीक्षक जैन, तसेच महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी मनोज म्हस्के, सुधाकर शिंदे, यासीन पिंजारी आणि प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली.
महसूल प्रशासनाने अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
या कारवाईमुळे अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
