रमाई आवास योजनेतील लाभार्थ्याची प्रशासनाविरोधात नाराजी; फोटो न काढल्याने हप्ता रखडल्याचा आरोप
सोयगाव पंचायत समितीतील अधिकाऱ्यांवर दिरंगाईचा आरोप; लाभार्थ्याने बीडीओंकडे कारवाईची मागणी
सोयगाव | प्रतिनिधी :
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकामाचा आवश्यक टप्पा पूर्ण करूनही अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी व छायाचित्रे न काढल्यामुळे पुढील हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप लाभार्थी रमेश श्रावण पारखे यांनी केला आहे.
पारखे यांच्या म्हणण्यानुसार, घरकुलाचे वीट बांधकाम सुमारे चार ते पाच फूट उंचीपर्यंत पूर्ण झाले आहे. पुढील हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेली जागेची पाहणी आणि छायाचित्रे काढण्यासाठी त्यांनी पंचायत समिती, सोयगाव येथील संबंधित अधिकारी काटकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र प्रत्येकवेळी तारीख देण्यात येत असून प्रत्यक्ष पाहणीसाठी अधिकारी येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुढील हप्ता रखडल्यामुळे घरकुलाचे बांधकाम थांबले असून कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही पारखे यांनी सांगितले. सध्या आपला संसार उघड्यावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी करून लाभार्थ्याचा रखडलेला हप्ता मंजूर करावा तसेच दिरंगाई झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची व नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थी रमेश श्रावण पारखे यांनी गटविकास अधिकारी (बीडीओ), पंचायत समिती सोयगाव यांच्याकडे केली आहे.
