विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कळमसरे गावावर शोककळा
फवारणीसाठी पाणी काढताना घडला अपघात; अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
कळमसरे (ता. अमळनेर) | प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे शेतातील फवारणीसाठी पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक राजपूत हे मंगळवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता बैलगाडीसह स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी जात होते. गावाबाहेरील गणपती मंदिराजवळील विहिरीवर फवारणी पंपात पाणी भरण्यासाठी ते थांबले. चार-पाच बादल्या पाणी काढल्यानंतर शेवटची बादली काढत असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले.
घटनेची माहिती मंदिराजवळील किशोर हरी मालचे यांना मिळताच त्यांनी तातडीने गावातील नातेवाईकांना कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने दीपक यांना विहिरीतून बाहेर काढून त्वरित अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील व सरपंच यांनी घटनास्थळी पंचनामा करून मारवड पोलीस ठाण्याला माहिती दिली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक राजपूत यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार असून, घरातील कर्त्या मुलाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजित मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.
