रावेर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडतीला वेग!
OBC प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित; ५८ सरपंचपदांसाठी आज महिला आरक्षणाची सोडत
वाघोदा (प्रतिनिधी) अक्षय वाघ : रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण प्रक्रियेला वेग आला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) यासाठी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी तहसील कार्यालयात काढण्यात आली. या वेळी ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, इच्छुक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया पार पडली. प्रभारी तहसीलदार संजय तायडे, निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. पाटील आणि महसूल सहायक भूषण तायडे यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने OBC प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली.
या १७ ग्रामपंचायतींमध्ये OBC आरक्षण
OBC प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या १७ ग्रामपंचायतींमध्ये उटखेडा, सुनोदा, वाघोदे बुद्रुक, कर्जाद, अजनाड, थोरगव्हाण, विवरे बुद्रुक, सिंगत, रणगाव, अहिरवाडी, खिर्डी खुर्द, खिर्डी बुद्रुक, धुरखेडा, वाघाडी, दसनूर, रमजीपूर आणि अजंदे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
५८ सरपंचपदांसाठी महिला आरक्षणाची सोडत
दरम्यान, OBC प्रवर्गातील १७ सरपंचपदांसह सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंचपदांसाठी महिला आरक्षणाची सोडत मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता काढण्यात येणार आहे. महसूल उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.
सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंचपदांसाठी रेभोटा, पुरी, गाते, कोचुर खुर्द, भोकरी, कोळोदे, केहऱ्हाळे खुर्द, नांदूरखेडा, सावखेडा खुर्द, वडगाव, भाटखेडा, केहऱ्हाळे बुद्रुक, खिरोदा प्रगणे यावल, रसलपूर, उधळी बुद्रुक, रोझोदे, विटवे, तांदलवाडी, तामसवाडी, ऐनपूर, उधळी खुर्द, शिंगाडी, मोरगाव खुर्द, खिरवड, आठवडे, पातोंडी, मंगलवाडी, सुलवाडी, निंभोरासिम, कांडवेल, शिंदखेडा, मस्कावद खुर्द, मोरगाव बुद्रुक, निंबोल, बक्षीपूर, रायपूर, तासखेडा, आंदलवाडी, गौरखेडा बलवाडी आणि निंभोरा बुद्रुक या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आरक्षणामुळे राजकीय हालचालींना वेग
सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव होते, याकडे इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण ५८ सरपंचपदांसाठी महिला आरक्षणाची सोडत होणार असल्याने या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोडतीनंतर विविध ग्रामपंचायतींमध्ये इच्छुक उमेदवारांच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
