भुसावळ नगरपरिषदेत हालचाल रजिस्टरवरून वाद; नागरिकाने मागितला लेखी खुलासा
पाणीपुरवठा विभागातील तक्रारीच्या पाठपुराव्यात ‘मुव्हमेंट रजिस्टर’ची मागणी; आवाज दाबल्याचा आरोप
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात दाखल केलेल्या तक्रार अर्जाच्या कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाने अधिकाऱ्यांच्या हालचाल (Movement) रजिस्टरची मागणी केल्यानंतर नगरपरिषदेत वाद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ते पाणीपुरवठा विभागातील आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात गेले असता संबंधित अधिकारी दिपक चौधरी कार्यालयात उपस्थित नव्हते. अधिकारी कुठे गेले आहेत, अशी विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांनी “ते बाहेर गेले आहेत,” असे सांगितले.
यानंतर प्रमोद पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जाण्याची नोंद तपासण्यासाठी हालचाल (Movement) रजिस्टर दाखविण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेत असे रजिस्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त करत, अ वर्ग नगरपरिषदेमध्ये अधिकाऱ्यांच्या हालचालींची नोंद ठेवली जात नाही का? असा सवाल उपस्थित केला.
प्रमोद पाटील यांनी या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी खुलासा मागितला असून, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा तसेच आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत नगरपरिषद प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. ती मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
