भवरखेडे-विवरे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
गुरूवंदना, विद्यार्थ्यांची मनोगते आणि शिक्षकांचा सन्मान; संस्कारमय वातावरणात कार्यक्रम संपन्न
भवरखेडे | प्रतिनिधी : अजय बाविस्कर
धरणगाव तालुक्यातील भवरखेडे-विवरे विद्यालयात भारतीय संस्कृतीतील पवित्र गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन, गुरूवंदना, विद्यार्थ्यांची भाषणे आणि शिक्षकांचा सन्मान हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंचे जीवनातील महत्त्व, त्यांचे मार्गदर्शन आणि संस्कार यावर प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच गुरूवंदना, गीत आणि गुरुपरिवर्तन गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि पेन भेट देत त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्याध्यापिका सोनल पाटील तसेच शिक्षक समाधान पाटील, स्वप्निल पवार, राजेश ठाकरे, पंकज ठाकरे, अनिता पाटील, सविता पाटील आणि सुनीता लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जीवनात शिस्त, विनयशीलता, परिश्रम आणि अभ्यासाचे महत्त्व सांगितले. गुरूंच्या आदर्शांवर चालून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेशही त्यांनी दिला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा गुरुपौर्णिमा सोहळा आनंददायी आणि संस्कारमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
