जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट; पुढील २४ ते ४८ तास अतिवृष्टीचा इशारा
मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, प्रशासन हाय अलर्टवर
जळगाव | प्रतिनिधी – हर्षल पाटील : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि जिल्हा प्रशासनाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून सर्व शासकीय यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नदी-नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांसाठी प्रशासनाच्या सूचना
-
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
-
नदी, नाले, पूल, धबधबे आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याजवळ जाणे टाळावे.
-
विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये.
-
अफवांवर विश्वास न ठेवता केवळ हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके, आपत्कालीन साहित्य आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले असून पूरप्रवण भाग, धरणे, नद्या आणि नाल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
आपत्कालीन संपर्क
-
टोल फ्री: 1077
-
जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष: 0257-2217193 / 0257-2223180
-
व्हॉट्सॲप हेल्पलाईन: 9373789064
प्रशासनाने नागरिकांना “सुरक्षित राहा, सतर्क राहा” असे आवाहन करत हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
