वाहनधारकांसाठी मोठा दिलासा! BS6 वाहनांना आता ३ वर्षांतून एकदाच PUC; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव
नवीन BS6 वाहनांसाठी नियमांमध्ये मोठा बदल प्रस्तावित; जुन्या वाहनांसाठी अधिक कडक प्रदूषण तपासणीची तरतूद
नवी दिल्ली | प्रतिनिधी : हर्षल पाटील
देशातील कोट्यवधी वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC – Pollution Under Control Certificate) नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा मसुदा प्रस्ताव जारी केला आहे. या प्रस्तावानुसार सहा वर्षांपर्यंतच्या खासगी BS6 वाहनांना तीन वर्षांतून एकदाच PUC प्रमाणपत्र काढावे लागणार असून, त्यामुळे वाहनधारकांना वारंवार प्रदूषण तपासणी करण्याच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे
प्रस्तावातील महत्त्वाचे बदल
मसुदा प्रस्तावानुसार, सहा वर्षांपर्यंतची BS6 खासगी वाहने यांना दरवर्षी PUC काढण्याऐवजी तीन वर्षांतून एकदाच प्रमाणपत्र घेणे पुरेसे राहील. याशिवाय सहा ते दहा वर्षे जुन्या BS6 वाहनांसाठी वार्षिक किंवा स्वतंत्र श्रेणीतील तपासणी, तर BS4 वाहनांसाठी सहा महिन्यांनी आणि BS1, BS2 व BS3 वाहनांसाठी प्रत्येक तीन महिन्यांनी PUC तपासणी करण्याचा प्रस्ताव आहे. प्रदूषणाचे प्रमाण लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने तपासणीची ही प्रणाली प्रस्तावित करण्यात आली आहे
काय होणार फायदा?
आधुनिक BS6 तंत्रज्ञानामुळे ही वाहने तुलनेने कमी प्रदूषण करतात. त्यामुळे अशा वाहनधारकांचा वेळ, खर्च आणि वारंवार PUC केंद्रांवर जाण्याची गरज कमी होईल. तसेच प्रदूषण तपासणी केंद्रांवरील ताणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अजून नियम लागू नाही
महत्त्वाचे म्हणजे, हा केवळ मसुदा (Draft Notification) असून अद्याप अंतिम नियम लागू झालेला नाही. केंद्र सरकारने या प्रस्तावावर नागरिक, संबंधित संस्था आणि भागधारकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी करूनच नवीन नियम लागू केले जातील. तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेले PUC नियमच लागू राहतील.
तज्ज्ञांचे मत
वाहतूक आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कमी प्रदूषण करणाऱ्या आधुनिक वाहनांसाठी नियम शिथिल करताना जास्त प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सरकारचा हा प्रयत्न पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.
