“माझे दुर्लक्ष नाही; ग्रामस्थांचे निवेदन दोन दिवसांतच पोलिसांकडे पाठवले” – पोलिस पाटील धर्मराज बाविस्कर • पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांचा संताप, मोर्चा व उपोषणाचा इशारा
यावल | हर्षल पाटील, प्रतिनिधी
यावल तालुक्यातील आडगाव येथील वाढत्या अवैध दारूविक्रीच्या प्रश्नावर आता नवे वळण आले असून, ग्रामस्थांच्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष केल्याच्या चर्चांना पोलिस पाटील धर्मराज रामदास बाविस्कर यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. ग्रामस्थांनी दिलेले निवेदन अवघ्या दोन दिवसांतच यावल पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आले असून, आपल्या अधिकारातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही पोलिस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आडगावमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री वाढल्याने गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून, कौटुंबिक वाद, हिंसाचार आणि तरुण पिढीचे वाढते व्यसन यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व मुलींना सार्वजनिक ठिकाणी वावरताना असुरक्षित वाटत असल्याची भावना देखील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर २१ जून २०२६ रोजी ग्रामस्थ, महिला भगिनी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने अवैध दारूविक्रीवर तातडीने कारवाई करून गाव दारूमुक्त करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन पोलिस पाटील धर्मराज बाविस्कर यांच्याकडे देण्यात आले होते.
याबाबत माहिती देताना पोलिस पाटील धर्मराज बाविस्कर म्हणाले, “ग्रामस्थांकडून अर्ज मिळाल्यानंतर केवळ दोन दिवसांत, म्हणजेच २३ जून २०२६ रोजी मी तो यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठविला. माझ्या अधिकारातील सर्व कामकाज वेळेत पूर्ण झाले असून, पुढील कारवाईची जबाबदारी पोलिस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे.”
त्यांनी पाठविलेल्या पत्रात गावात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीची खातरजमा करून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली होती.
मात्र, निवेदन सादर होऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित विभागांकडून कोणतीही मोठी कारवाई किंवा धाड टाकण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात अवैध दारूविक्री पूर्ववत सुरू असून, संबंधितांमध्ये कारवाईची भीती उरलेली नसल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ, युवक आणि महिला वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध दारूविक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, लवकरच ठोस कारवाई न झाल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करण्यात येईल. तसेच यावल पोलिस ठाण्यासमोर मोर्चा, उपोषण आणि तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आडगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
