चावलखेडा येथे प्रशासनाची तातडीची कारवाई; नायब तहसीलदार, पोलीस व बचाव पथकाच्या समन्वयातून श्री. सुरेश भील यांना दिला जीवदान
। धरणगाव ग्रामीण प्रतिनिधी । विनोद मोरे ।
धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीची प्रशासनाने धाडसी आणि यशस्वी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. या वेळी प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुसळधार पावसामुळे अंजनी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने श्री. सुरेश भील हे पुराच्या पाण्यात अडकून झाडावर आश्रय घेण्यास बाध्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत बचाव कार्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर बचाव पथकाने अत्यंत धाडसाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने नदीत उतरून श्री. सुरेश भील यांची सुरक्षित सुटका केली. बचाव मोहीम यशस्वी झाल्यानंतर प्रशासन, बचाव पथक आणि उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
