यावल पोलिसांना निवेदन; अवैध दारू अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी, धरणे आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा
यावल | प्रतिनिधी : राहुल जयकर
यावल तालुक्यातील मोहराळा येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारूधंद्याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाईची मागणी केली आहे. अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा यावल पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण तसेच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मोहराळा गावात अनेक ठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या व्यसनामुळे युवक भरकटत असून अनेक कुटुंबे आर्थिक आणि सामाजिक अडचणीत सापडत आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी असा आरोप केला की, या प्रकाराबाबत वारंवार तोंडी तक्रारी करूनही प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावातील सर्व कथित अवैध दारू अड्ड्यांवर विशेष पथकाद्वारे धडक कारवाई करून संबंधित आरोपींना अटक करावी. तसेच या अवैध व्यवसायाला संरक्षण देणाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गौरव सोनवणे (भीम आर्मी भारत एकता मिशन, यावल तालुका सचिव), सतीश अडकमोल (ऑल इंडिया पँथर सेना, यावल तालुका अध्यक्ष), विनोद अडकमोल, गोविंदा सोनवणे, सचिन वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनानंतरही तातडीने कारवाई न झाल्यास भीम आर्मी भारत एकता मिशनच्या नेतृत्वाखाली यावल पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
“मोहराळा दारूमुक्त झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांसह भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
