ज्येष्ठांची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा’ – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
‘डोळ्यांत प्रकाश… चेहऱ्यावर हास्य… हाच खरा जनसेवेचा आनंद’; जीपीएस परिवाराच्या फिरत्या नेत्रालयातून ६५० ज्येष्ठांना मोफत चष्म्यांचे वाटप
पाळधी | जळगाव, दि. १ | प्रतिनिधी :
“ज्येष्ठांच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश फुलवणे म्हणजे त्यांच्या उर्वरित आयुष्याला आनंद, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी पहाट देणे होय. जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील प्रकाश हाच माझ्या जनसेवेचा खरा पुरस्कार आहे. ज्येष्ठांची सेवा हीच परमेश्वराची खरी सेवा आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
जीपीएस परिवाराच्या पुढाकारातून पाळधी येथील सुगोकी लॉन येथे आयोजित मोफत चष्मा वितरण कार्यक्रमात धरणगाव व जळगाव तालुक्यातील पात्र ठरलेल्या सुमारे ६५० ज्येष्ठ नागरिकांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील १७ हजारांहून अधिक दृष्टीदोष असलेल्या नागरिकांची आतापर्यंत मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार अनेकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच अनेक गरजू रुग्णांना पनवेल येथील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
वृद्धांना शहरात येण्याचा त्रास होऊ नये म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या फिरत्या नेत्रालयाच्या माध्यमातून गावागावांत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरांमधील तपासणीनंतर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले.
अनेक गावांतील ज्येष्ठांना लाभ
जीपीएस परिवारातर्फे आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरे धरणगाव तालुक्यातील बिलखेडा, कल्याणे खुर्द, धरणगाव, सोनवद, नांदेड, पाळधी तसेच जळगाव तालुक्यातील आसोदा, मनुराबाद, जळके, नशिराबाद, विदगाव आणि म्हसावद येथे घेण्यात आली होती. या शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या पात्र ६५० लाभार्थ्यांना या कार्यक्रमात मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जीपीएस परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, गावागावांत जाऊन आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि कार्यकर्ते हेच समाजाची खरी ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. त्यांनी जीपीएस परिवारामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची व नेत्रतपासणी मोहिमेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले, तर धनराज कासट यांनी आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती पती जनाआप्पा कोळी, विकास सोसायटीचे चेअरमन जितू पाटील, संदीप सुरळकर, विदगावचे सरपंच राजेंद्र कोळी यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीपीएस परिवाराचे सर्व पदाधिकारी, संचालक तसेच सचिन भोई आणि अजय कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
