‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ : बालविधीसंघर्षग्रस्त मुलांना नवी दिशा देणारा जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम
१५० हून अधिक मुलांचा सहभाग; पुनर्वसन, समुपदेशन आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
जळगाव | प्रतिनिधी
समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे आणि चुकीच्या मार्गावर गेलेल्या बालकांना नवजीवन देणे या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाने ‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पुनर्वसन कार्यशाळेचे आयोजन केले. पोलीस मुख्यालयातील पद्मालय हॉल येथे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यात प्रथमच अशा व्यापक स्वरूपाची पुनर्वसन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, १५० हून अधिक बालविधीसंघर्षग्रस्त (Juveniles in Conflict with Law) मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा सकारात्मक वाटेवर आणणे, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, गुन्हेगारीपासून कायमस्वरूपी दूर ठेवणे आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर तसेच आधार संस्थाच्या विद्या सोनार यांच्यासह विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यक्तिमत्त्व विकास, जीवनकौशल्ये, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढविणे या विषयांवर मार्गदर्शन केले.
समुपदेशनाच्या माध्यमातून मुलांच्या मनातील भीती, संभ्रम आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना नव्याने स्वप्ने पाहण्याची, स्वतःच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देण्याची आणि समाजात सन्मानाने उभे राहण्याची प्रेरणा देण्यात आली.
उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी जळगाव पोलिसांनी शालेय बसची व्यवस्था केली होती. प्रत्येक मुलाची स्वतंत्र नोंदणी करून त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार पुनर्वसन आणि समुपदेशनाचा आराखडा तयार करण्यात आला. कार्यशाळेनंतरही स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून प्रत्येक मुलाचा सातत्याने पाठपुरावा केला जाणार असून स्वयंसेवी संस्था, पालक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना हॅवरसॅक बॅगचे वाटप करण्यात आले. या बॅगचे प्रायोजकत्व राजेंद्र यवले यांनी केले.
जळगाव पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ गुन्हेगारी नियंत्रणापुरता मर्यादित नसून, चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समाजात सन्मानाने जगण्याची नवी संधी देणारा ठरत आहे. गुन्हेगार निर्माण होऊ नयेत, त्याऐवजी जबाबदार, सशक्त आणि कायद्याचा आदर करणारे नागरिक घडावेत, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
“कुछ नहीं तो कम से कम,
ख़्वाब-ए-सहर तो देखा है…
जिस तरफ़ किसी ने देखा न था,
हमने उस तरफ़ देखा तो है.”
