मुसळधार पावसाच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर कंकराज धरणात सापडला
दोन दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट; शेवगे बुद्रुकच्या २२ वर्षीय समाधान भिलच्या मृत्यूने परिसरात शोककळा, कुटुंबासाठी मदतीची मागणी
पारोळा | प्रतिनिधी (सुरेश पाटोळे)
पारोळा तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेवगे बुद्रुक येथील समाधान चुडामण भिल (वय २२) या आदिवासी तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी कंकराज धरणात आढळून आला. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांकडून सुरू असलेल्या शोधमोहीमेचा अखेर दुर्दैवी शेवट झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पारोळा तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. पारोळा-बहादरपूर मार्गावरील शिवल्या नाला ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा आल्याने समाधान भिल पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, दोन दिवस अथक प्रयत्न करूनही त्याचा शोध लागला नव्हता.
रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शेवगे बुद्रुक गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील कंकराज धरणात मृतदेह तरंगताना काही ग्रामस्थांना दिसला. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते, कैलास साळुंखे आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.
दोन दिवस पाण्यात राहिल्यामुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन बाविस्कर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
समाधान भिल हा आपल्या कुटुंबाचा कमावता सदस्य होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांमध्ये अचानक पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे किंवा पाण्याचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
