‘पोषण आहार’ आता अधिक चवदार; अंगणवाडीतून मिळणार व्हेज पुलाव आणि बहुधान्य पफ
महिला व बालविकास विभागाचा निर्णय; नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
नंदुरबार | प्रतिनिधी
अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना अधिक पौष्टिक व रुचकर आहार मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने ‘घरपोच पोषण आहार’ (THR) योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. संतुलित आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रथमच व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ (Multigrain Puffs) यांचा पोषण आहारात समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी अंगणवाड्यांमधील खिचडीची चव एकसुरी असल्याची तक्रार अनेक ठिकाणी येत होती. ही बाब लक्षात घेऊन आता खिचडीसोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे खिचडी अधिक रुचकर होईल आणि आहार वाया जाण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.
महिला व बालविकास विभागाने यापूर्वी दिले जाणारे पौष्टिक मिश्रण आणि इतर आवश्यक पोषण घटक कायम ठेवत नव्या पाककृतींचा समावेश केला आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या पदार्थांचा समतोल साधत लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार पोषण आहार मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
या सुधारित पोषण आहाराचा लाभ खालील लाभार्थींना मिळणार आहे:
-
३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके
-
गरोदर महिला
-
स्तनदा माता
-
किशोरवयीन मुली
नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे २,४०० अंगणवाड्यांमधील हजारो बालके, महिला आणि मुलींना या सुधारित योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, सुधारित पोषण आहाराची अंमलबजावणी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक नियोजन आणि पुरवठा व्यवस्था करण्यात येत आहे.
या नव्या आहारामुळे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असून, बालकांमध्ये पोषण आहाराची स्वीकारार्हता वाढवून कुपोषणमुक्त समाज घडवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
