लोकसंपर्क अभियानात आमदार अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना इशारा; नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाहीचे आदेश
महसूल, घरकुल, पाणंद रस्ते, पीकविमा व मूलभूत सुविधांबाबत कालबद्ध निपटाऱ्याच्या सूचना
सोयगाव | प्रतिनिधी | ३ ऑगस्ट
आमदार अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली सोयगाव येथील पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात लोकसंपर्क अभियानांतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारींची सुनावणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सत्तार यांनी दिले.
तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत फेरफार, वारस नोंद, नामांतरण, ७/१२ दुरुस्ती, ई-पीक पाहणी, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती पंचनामे, महसूल न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, गौण खनिजांची अवैध वाहतूक तसेच जात, उत्पन्न आणि रहिवासी दाखल्यांसह सर्व महसूल विषयक प्रकरणांचा कालबद्ध निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीत प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जावर वेळेत कार्यवाही करून संबंधित अर्जदाराला त्याची माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पाणंद रस्त्यांबाबत निर्माण झालेले तिढे तातडीने सोडवून रखडलेली कामे सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पंचायत समिती कार्यालयातील बैठकीत घरकुल, विहीर, रोजगार हमी योजनेसह विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे नमूद करत अशा प्रकारांना कोणतीही पाठीशी घातली जाणार नाही, असा कडक इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला.
पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत योजनांच्या लाभापासून वंचित ठेवू नये, नागरिकांच्या अर्जांचा निश्चित कालमर्यादेत निपटारा करावा, ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांना गती द्यावी तसेच पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, घरकुल, शौचालय आणि रोजगार हमी यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
