जळगावातील ‘बाबा चिवडा’ उद्योगात भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
एमआयडीसीतील उद्योगाला सकाळी आग; जवानांच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांनी आगीवर मिळवले नियंत्रण, कारणाचा तपास सुरू
जळगाव | प्रतिनिधी : धीरज सैतवाल
जळगाव एमआयडीसी परिसरातील सुप्रसिद्ध ‘बाबा चिवडा’ उद्योगात सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन उपकेंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेत अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना आणि कोट्यवधी रुपयांचे संभाव्य नुकसान टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आग लागल्याचे वृत्त मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी अग्निशमन बंब व आवश्यक यंत्रणा रवाना केली. आग वेगाने पसरत असतानाही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ती इतर भागात पसरण्यापासून रोखली. त्यामुळे आजूबाजूच्या औद्योगिक युनिट्सनाही कोणताही धोका निर्माण झाला नाही.
या बचाव मोहिमेत वाहनचालक यूसुफ पटेल, मयुर ओतारी आणि शोएब तडबी यांनी अग्निशमन वाहने आणि यंत्रणा योग्य वेळी घटनास्थळी पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, इकबाल तडवी, राकेश पाटील, विक्की सोनवणे आणि सतार तडवी यांनी जीवाची पर्वा न करता धाडसीपणे आग विझविण्याचे काम केले.
अग्निशमन दलाच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे आग अल्पावधीत नियंत्रणात आली. त्यामुळे उद्योग परिसरातील इतर युनिट्स आणि साहित्य सुरक्षित राहिले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी आर्थिक नुकसानीचा अंदाज संबंधित यंत्रणांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, संबंधित विभागाकडून सखोल तपास सुरू आहे. तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
