झुरखेडा गावच्या लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा पाटील यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार
ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल; पुण्यातील सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळ्यात झाला गौरव
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावचे लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा पाटील यांना ग्रामविकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘आदर्श सरपंच’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नालंदा ऑर्गनायझेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा – २०२६’ मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा १ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे उत्साहात पार पडला. सामाजिक, राजकीय, आरोग्य, शिक्षण, कला, उद्योग, सेवा आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
समाजात सकारात्मक आणि परिवर्तनशील कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात एआरजे एशिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष जितेंद्र तुळशीराम दाते तसेच ‘देऊळ बंद’ चित्रपटातील अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते सुरेशआप्पा पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
झुरखेडा गावात लोकसहभागातून राबविण्यात आलेली विकासकामे, पारदर्शक प्रशासन, ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, लोकाभिमुख कारभार आणि विविध सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे झुरखेडा गावासह धरणगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कारानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, तालुक्यातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी सुरेशआप्पा पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील विकासात्मक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
