पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी गार्गी विनोद बाऱ्हे शाळेत प्रथम
३०० पैकी २३४ गुणांची उल्लेखनीय कामगिरी; सावदा परिसरात अभिनंदनाचा वर्षाव
भुसावळ | प्रतिनिधी : संघरत्न सपकाळे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी गार्गी विनोद बाऱ्हे हिने ३०० पैकी २३४ गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह संपूर्ण सावदा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गार्गी ही प्रकाश विद्यालय, वाघोदा येथील शिक्षक विनोद बाऱ्हे आणि उमेश्वर विद्यालय, दसनूर येथील शिक्षिका सोनल बाऱ्हे यांची कन्या आहे. लहान वयातच अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे घवघवीत यश संपादन केले आहे.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना गार्गीने या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, काका-काकू आणि कुटुंबीयांच्या सततच्या मार्गदर्शनाला दिले. तिच्या यशामागे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे तिने नमूद केले.
गार्गीच्या या यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, वर्गमित्र यांनी तिचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेनेही तिच्या यशाचा गौरव करत इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले.
तिच्या या यशामुळे सुगंगा नगर, सावदा तसेच उदळी परिसरात आनंदाचे वातावरण असून, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही शिक्षण क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करून शाळेचे व पालकांचे नाव उंचावेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.
