ऑटो रिक्षा, शालेय व्हॅनच्या भाडेदर पुनर्निर्धारणाची मागणी; वीर सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
इंधन, देखभाल व वाहन खर्चात प्रचंड वाढ; जिल्हा परिवहन प्राधिकरणाची तातडीने बैठक घेऊन नवीन दर मंजूर करण्याची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
इंधन दरवाढ, वाहन देखभाल खर्च आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ऑटो रिक्षा, शालेय व्हॅन व स्कूल बस चालकांना दिलासा देण्यासाठी प्रवासी व विद्यार्थी वाहतूक भाडेदरांचे तातडीने पुनर्निर्धारण करण्यात यावे, अशी मागणी वीर सावरकर रिक्षा युनियन, जळगाव यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिवहन प्राधिकरण (DTA) अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत सीएनजी, एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाहनांचे सुटे भाग, विमा, टायर, फिटनेस, कर, दुरुस्ती आणि देखभाल खर्चातही सातत्याने वाढ होत आहे. मात्र, या वाढीच्या तुलनेत रिक्षा व शालेय वाहतूक भाडेदरांमध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एलपीजीचे दर पूर्वी सुमारे ५३ रुपये प्रति लिटर होते. विविध कारणांमुळे ते १२५ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले होते आणि सध्या देखील सुमारे ९० रुपये प्रति लिटर आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
रिक्षाचालक नागरिकांना सातत्याने सेवा देत असले तरी किरकोळ भाडेवाढ केली तरी त्यांच्यावर टीका होते. मात्र, त्यांच्या वाढत्या खर्चाचा विचार शासन आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
युनियनने जिल्हा परिवहन प्राधिकरणाची तातडीने बैठक बोलावून ऑटो रिक्षा, शालेय व्हॅन आणि स्कूल बसच्या प्रवासी व विद्यार्थी वाहतुकीसाठी वास्तववादी भाडेदर निश्चित करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच नवीन दरांना त्वरित मंजुरी देऊन त्याबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जिल्हा परिवहन प्राधिकरणाचे सचिव आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत. रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा युनियनने व्यक्त केली आहे.
