धुळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली
पुराच्या पाण्यामुळे जलस्रोतांमध्ये गाळाचे प्रमाण वाढले; पाणी उकळून व निर्जंतुकीकरण करूनच वापरण्याचे मनपाचे आवाहन
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील विविध भागांमध्ये दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसानंतर जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व माती मिसळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता पाणी योग्य प्रकारे निर्जंतुक करून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी सांगितले की, धुळे शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तापी नदी आणि अक्कलपाडा धरणातील पाण्याची पातळी वाढली. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती व गाळ जलस्रोतांमध्ये मिसळल्याने पाणी गढूळ झाले असून त्याचा परिणाम शहरातील काही भागांतील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
महापालिकेकडून पाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा करत नागरिकांनी अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी पिण्यापूर्वी पाण्यात ‘जीवन ड्रॉप’चे दोन थेंब टाकावेत, आवश्यक असल्यास तुरटीचा वापर करावा आणि त्यानंतर पाणी उकळूनच पिण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे. त्यामुळे पाण्यातील संभाव्य जंतूंचा धोका कमी होऊन आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील अनेक भागांमध्ये नळाला गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असून, पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महापालिकेने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले आहे.
